Description
पुराणकाळापासून स्टॅटिस्टिक्स रोजच्या व्यवहारात कळत-नकळतपणे वापरलं जात आहे. आजच्या डेटा सायन्सच्या काळात तर त्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढलेलं आहे. स्टॅटिस्टिक्स हा डेटा सायन्सचा आत्मा आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण कॉम्प्युटरवर काम होत असलं तरी मूळ संकल्पना स्टॅटिस्टिक्समधल्याच असतात. स्टॅटिस्टिक्सचा आपण जगत असलेल्या विश्वाशी, माणसांशी घनिष्ठ संबंध असतो. कारण यात लागणारा डेटा हे विश्व, त्यातली माणसं आणि त्यांची माहिती याविषयीचा असतो. अशा डेटाची मांडणी, विश्लेषण आणि त्यातले परस्परसंबंध कसे ओळखायचे हे सगळं स्टॅटिस्टिक्समध्ये येतं. आर्टिफिशियल इंटेलिजंसमधलं जे मशीन लर्निंग आहे, त्यात मोठा डेटाच इनपुट म्हणून द्यावा लागतो. त्यामुळे त्यातही स्टॅटिस्टिक्स लागतंच. स्टॅटिस्टिक्सला आजचं स्वरूप कसं प्राप्त झालं, त्याचा इतिहास, त्यातल्या संशोधकांचे संघर्ष, त्यांच्यातले वादविवाद, तसंच प्रॉबॅबिलिटी ही संकल्पना जुगारातून कशी निर्माण झाली, तिच्या विकासाचे टप्पे हे सगळं मनोरंजक पद्धतीनं यात लिहिलं आहे. कोणत्याही क्षेत्रात स्टॅटिस्टिक्स वापरायचं असेल, तर त्यातली मूलतत्त्वं समजली पाहिजेत. इथे ती सोप्या पद्धतीनं सांगितली आहेत. त्यामुळे फक्त स्टॅटिस्टिक्सचेच नव्हे, तर इतर विषयाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. नोकरी व्यवसायात स्टॅटिस्टिक्स किती महत्त्वाचं आहे, याचं भान विद्यार्थी आणि पालकांना यावं याची काळजी या पुस्तकात घेतली आहे. तांत्रिक गोष्टी आवश्यक तेवढ्याच घेऊन सोपेपणा आणि रंजकतेला प्राधान्य दिलं आहे. तसंच स्टॅटिस्टिक्सची भीती कमी होऊन कुतूहल वाढावं या उद्देशानं हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक लोकांनी कादंबरीसारखं वाचावं.